Ad will apear here
Next
कभी खुद पे कभी हालात पे...
...‘हम दोनों’च्या लोकप्रिय गाण्यांसह अनेक गाण्यांना श्रवणीय संगीत देणारे संगीतकार जयदेव यांचा जन्मदिन तीन ऑगस्टला होऊन गेला.. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘हम दोनों’मधीलच ‘कभी खुद पे कभी हालात पे...’ या गीताचा...
..........
२०१८मध्ये अनेक कलावंतांची जन्मशताब्दी होती. त्यांची नावे चित्रपटप्रेमींच्या चर्चेत होती. तथापि त्यामध्ये एका अशा संगीतकाराचेही नाव होते, की ज्याच्या नावाचा उल्लेख ‘आवडता संगीतकार’ म्हणून त्याच्या हयातीत फारसा कोणी केला नव्हता. त्यामुळे त्याच्या माघारीही जन्मशताब्दी किती जण लक्षात ठेवणार म्हणा. आवडता संगीतकार म्हणून त्याचा पटकन उल्लेख केला जात नसला तरी ‘रात भी है कुछ भीगी भीगी...’ (मुझे जीने दो), ‘ये दिल और उनकी निगाहों की सायें...’ (प्रेमपर्बत), ‘आपकी याद आती रही...’‘सीने में जलन...’ (गमन) ही गाणी आणि महत्त्वाचे म्हणजे (देव आनंदच्या) ‘हम दोनों’ची सर्व गाणी आवडणारे असंख्य श्रोते भेटतील. आपल्याला आवडणाऱ्या या गाण्यांचा संगीतकार म्हणजे जयदेव आणि त्यांचा जन्मदिन तीन ऑगस्ट १९१९. ही आठवण करून देण्यासाठीच आजचे सुनहरे गीत.

१९३३च्या सुमारास जयदेव मुंबईत आले होते. चित्रपटात काम करायचे, अभिनय करायचा अशी त्यांची स्वप्ने होती. लहानपणी आईला भजनाच्या कार्यक्रमात ते हार्मोनियमवरून साथ करीत. लोकसंगीत त्यांना बालपणापासून आवडे. त्यांच्या आई-वडिलांनाही संगीताची आवड होती. त्यामुळे मुंबईला येण्याआधी त्यांनी आपल्या मुलाची संगीतामधील आवड बघून लुधियाना येथील संगीत शाळेत दाखल केले होते. जेव्हा ते मुंबईत आले, तेव्हा त्यांच्या अभिनेता बनण्याच्या आवडीमुळे त्यांनी ‘वामन अवतार’ या चित्रपटात नारदाची भूमिका केली. त्यानंतर त्यांना काही चित्रपटात कामे मिळाली; पण ती नायकाची नव्हती, तर दुय्यम भूमिकांची होती. नायक म्हणून आपल्याला संधी मिळत नाही, हे लक्षात येताच त्यांनी गायक होण्याचे ठरवले; पण त्यातही ते यशस्वी ठरले नाहीत.

त्यानंतर काही काळाने त्यांनी लखनौला जाऊन तेथील आकाशवाणी केंद्रावर संगीत विभागात नोकरी स्वीकारली. पुढे आजारपणानंतर ते गायक बनू शकणार नाहीत, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही, हे बघून ते उदासपणे दिवस ढकलत होते. संगीत दिग्दर्शक अली अकबर खान यांना जयदेव यांची माहिती होती. खान यांना नवकेतन संस्थेच्या ‘आँधियाँ’ आणि ‘हमसफर’ या दोन चित्रपटांच्या संगीताचे काम मिळाले होते. तेव्हा त्यांनी त्यासाठी जयदेवना सहायक म्हणून बोलावून घेतले.

‘आँधियाँ’ प्रदर्शित झाल्यावर अली अकबर खान यांनी संगीतकार म्हणून काम करणे सोडून दिले. तेव्हा ‘नवकेतन’च्या चित्रपटांच्या संगीताची जबाबदारी एस. डी. बर्मन यांच्यावर सोपवण्यात आली. जयदेव हे खान यांच्याबरोबरच ‘नवकेतन’मध्ये दाखल झालेले असल्यामुळे, एस. डी. बर्मन यांचे सहायक म्हणून काम करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. जयदेव यांनी कोणतीही खंत न बाळगता ते काम स्वीकारले.

काही काळाने चेतन आनंद यांच्या ‘जोरू का भाई’ या चित्रपटाला संगीत देण्याचे काम स्वतंत्ररीत्या जयदेव यांना मिळाले. त्यातील ‘सुरमयी रात है, सुबह का इंतजार कौन करे’ हे गीत खूप लोकप्रिय ठरले. त्यानंतर ‘समुंदरी डाकू’, ‘अंजली’ याही चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. नंतर देव आनंद यांनी ‘हम दोनों’ची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. त्या संधीचे जयदेव यांनी सोने केले; पण पुढे त्यांना ‘नवकेतन’चा चित्रपट मिळाला नाही. का, याचे उत्तर इतिहासालाच माहीत.

‘हम दोनों’च्या नंतर दोन वर्षांनी ‘मुझे जीने दो’, नंतर ‘किनारे किनारे’, ‘जिओ और जीने दो’, ‘सपना’, ‘एक थी रोटी’ असे काही चित्रपट त्यांना मिळाले; पण या चित्रपटांमुळे ते प्रचंड लोकप्रियता मिळवू शकले नाहीत. १९७३च्या ‘प्रेमपर्बत’मधील ‘ये दिल और उनकी...’ या लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीताची चाल अप्रतिम होती. तसेच ‘गमन’मधील गीतांमुळे जयदेव पुन्हा चर्चेत आले होते. ‘रेश्मा और शेरा’, ‘अनकही’मधील गीते लक्षात राहणारी नव्हती; पण ‘घरोंदा’चे ‘आबोदाना ढूंढते है...’ हे गीत आजही ऐकावेसे वाटते.

जीवनातील हे चढ-उतार अनुभवत त्यांनी ३६ चित्रपटांना संगीत दिले; पण ते त्यांना स्वतःला योग्य वाटले तसे दिले. लोकांना आवडणारे संगीत म्हणून त्यांनी दिले नाही. त्यामुळेच ते मागे पडले. अर्थात ‘रेश्मा और शेरा’, ‘गमन’, ‘अनकही’ या त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांमुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले होते. मध्य प्रदेश सरकारने त्यांना ‘लता मंगेशकर सन्मान’ बहाल केला होता. दूरदर्शनचा काळ सुरू झाल्यावर त्यांनी ‘श्रीकांत’, ‘रामायण’, ‘बाबू’, ‘अमृता’ या मालिकांनाही संगीत दिले होते. 

सहा जानेवारी १९८७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांपैकी एक ‘सुनहरे गीत’ सांगायचे म्हणजे अवघड काम आहे. तरीसुद्धा ‘हम दोनों’ चित्रपटच प्रथम डोळ्यांपुढे येतो. त्यामधील पाच गीतांपैकी एक गीत - 

आयुष्यात किती दुःखे? किती सुखे? गणित मांडायला बसले, तर अश्रू, दुःख, अवहेलना यांचीच संख्या जास्त दिसेल. अशा वेळी पटकन ‘साहीर’ आठवतो. अशा वेळच्या आपल्या भावना, आपले विचार काय असतात, ते साहीर किती समर्पक शब्दांत सांगतात बघा -

बात निकली तो हर एक बात पे रोना आया

(आम्हाला) कधी स्वतःवर (तर) कधी (स्वत:च्या) परिस्थितीवर अश्रू ढाळावेसे वाटले. (आपण इतके कमनशिबी, म्हणून स्वत:चीच कीव करावीशी वाटली. म्हणून आम्ही सहज आमच्या आयुष्याचे सिंहावलोकन केले, तेव्हा तर) प्रत्येक गोष्ट (प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग) यावरच अश्रू ढाळावेसे वाटले. (त्या घटनांबद्दल खेद वाटला.)

हम तो समझे थे के हम भूल गये है उन को 
क्या हुआ आज ये किस बात पे रोना आया?

आम्ही समजून होतो, की (कधी काळी आपण ज्यांच्यावर प्रेम केले, त्या प्रिय व्यक्तींना) आम्ही ‘त्यांना’ विसरून गेलो आहोत. (ते त्यांच्या सहवासातील सुखद दिवस विसरून गेलो आहोत) (परंतु हे) काय झाले? (आज एकदम हे सारे आठवून) आज कोणत्या गोष्टींबद्दल (कोणाच्या आठवणीमुळे) डोळ्यात हे अश्रू जमा झाले आहेत?

किस लिए जीते है हम किस के लिए जीते है?
बारहा ऐसे सवालात पे रोना आया

नेमके कशामुळे अश्रू डोळ्यांत आले, या प्रश्नाचे उत्तर पुढे स्वत:च देताना साहीर लिहितात, की
कशासाठी जगतो आम्ही? कोणासाठी जगतो आम्ही? (आमच्यावर प्रेम करणारी माणसे आम्हाला मिळाली नाहीत अगर अल्पकाळ लाभली व आता दुरावली. त्यामुळे आता या जगण्याला काय अर्थ आहे? म्हणून हा प्रश्न, कशासाठी, कोणासाठी जगतो आम्ही?) वारंवार (बारहा) अशा प्रश्नांमुळेच (आमचे) डोळे पाण्याने भरून येत असावेत. 

जयदेव यांनी गीताच्या अंतिम कडव्यासाठी एक वेगळी चाल दिली आहे; पण त्यामुळे गीताची लय, प्रभाव कुठेही कमी झालेला नाही. अखेरच्या कडव्यात कवी म्हणतो, 

कौन रोता है किसी और की खातिर ऐ दोस्त 
सबको अपनीही किसी बातपे रोना आया

मित्रा (खरे तर) कोण रडते रे कोणासाठी? (दुसऱ्यासाठी रडणारे कमीच असतात. बहुधा) सर्वांना आपल्याच जीवनातील कोणत्या तरी घटनेबद्दल, गोष्टीबद्दल रडू येत असते. 

दोन-दोन ओळींचीच कडवी असणारे हे गीत मोहम्मद रफींनी ज्या खुबीने गायले आहे, त्याबद्दल सांगावे तेवढे कमीच आहे. संगीतकार जयदेव यांची चाल वर-वर सोपी वाटत असली, तरी तिला बारीक बारीक वळणे होती आणि मोहम्मद रफींनी ती लीलया पेलली होती. ‘हालात पे’, बात पे’ या शब्दांवर, या शब्दांपाशी रफी यांचा स्वर जी खोली गाठतो, ते तर कान देऊन ऐकण्याजोगे आहे. याच चित्रपटातील ‘मै जिंदगी का साथ...’ या गीताकरिता आशयाच्या अनुषंगाने आकर्षक चाल देणारे जयदेव या गीताच्या आशयाच्या अनुषंगाने किती वेगळी, पण योग्य चाल देऊन गेले आहेत. कडव्याकडे जाताना ध्रुवपदाची ओळ ‘रोना’ या शब्दावर अर्धवट अवस्थेत सोडणे व त्याच ठिकाणी शहनाईची आर्त तान मिसळणे, यात संगीतकाराच्या ‘टेकिंग’ची करामत दिसते व त्या ध्रुवपदाला आणि ओघानेच गाण्याला एक वजन प्राप्त होते. संगीतकार जयदेव यांची अशी बरीच वैशिष्ट्ये सांगता येतील.

पडद्यावरही हे गीत सादर करताना (डबल रोल असूनही) देव आनंद यांनी ते उत्कृष्टपणे सादर केले आहे. असे हे गीत सर्व बाजूंनी उत्कृष्ट व म्हणूनच ‘सुनहरे’!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZXEBR
Similar Posts
मोहब्बत जिंदा रहती है... अनेक श्रवणीय गीते दिलेले संगीतकार हंसराज बहल यांचा १९ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘मोहब्बत जिंदा रहती है...’ या गीताचा...
गम की अंधेरी रात में... हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान गीतकार जाँ निसार अख्तर यांचा आठ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘गम की अंधेरी रात में...’ या गीताचा...
याद न जाए बीते दिनों की... अभिनेते राजेंद्रकुमार यांचा स्मृतिदिन (१२ जुलै) नुकताच होऊन गेला, तर २० जुलै हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘याद न जाए बीते दिनों की...’ या गाण्याचा...
रहा गर्दिशों में हरदम... संगीतकार आणि गीतकार रवी यांचा जन्मदिन तीन मार्चला असतो, तर स्मृतिदिन सात मार्चला असतो. त्या औचित्याने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या एका गीताचा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language